
amol gupte photos in sakaal balmitra drawing competition
“एके काळी दहावीपर्यंत असलेला चित्रकला हा विषय शिक्षण व्यस्थेच्या दृष्टीने कमी महत्त्वाचा ठरत चालला आहे. शालेय शिक्षणात चित्रकला, नाट्य यासारख्या विषयांना स्थान असायला हवे,” असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक व चित्रकार अमोल गुप्ते यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
बालकुमारांचा अमाप उत्साह व अमोल गुप्ते यांच्याशी मनमोकळ्या गप्पांनी “सकाळ बालमित्र चित्रकला’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज रंगला. एम्प्रेस गार्डनच्या निसर्गरम्य वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातून आलेले राज्य पातळीवरील, तसेच पुणे शहर व विभागीय पातळीवरील सर्व वयोगटांतील बक्षीसपात्र विद्यार्थी व पालक उपस्थित होते. “सकाळ’च्या संचालिका मृणाल पवार, “साप्ताहिक सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले, स्पर्धेचे प्रायोजक असलेल्या फन्ट्रीन न्यूट्रिशियन लिमिटेडचे संचालक किशनलाल लोढा, मराठी मासिक विभागाचे मुख्य व्यवस्थापक विजय सबनीस व स्पर्धेच्या परीक्षकांच्या प्रतिनिधी डॉ. मालती आगटे या वेळी उपस्थित होते.
अमोल गुप्ते म्हणाले, “”"सकाळ’ने आयोजित केलेल्या या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रकलेची आवड लहान मुलांच्या मनात किती आहे हे लक्षात येईल. प्रत्येक चित्रातून काहीतरी शिकण्यासारखे असते. ग्रामीण भागातील मुलांचा या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद पाहता शहरी लोकांनी त्यांच्याकडून काही शिकण्यासारखे आहे.”
परीक्षकांच्या वतीने डॉ. आगटे यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “”स्पर्धेसाठी आलेल्या असंख्य चांगल्या चित्रांमधून अधिक चांगली चित्रे निवडण्याचे अवघड काम आमच्यावर होते. ते अधिक योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.”
अरणकल्ले यांनी प्रास्ताविक भाषणात “सकाळ समूहा’च्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सबनीस यांनी स्पर्धेची माहिती दिली. डॉ. आगटे यांच्यासह मुरली लाहोटी, प्रा. मिलिंद पडके, अशोक साईनकर, प्रभाकर दिवाकर, प्रा. जयसिंग जगताप व सुजाता तांबे या परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. स्वाती तोरे यांनी पुरस्कारांचे वाचन केले.
मुलांसोबत गुप्ते अमोलमय…
समारंभासाठी आलेल्या लहान मुलांमध्ये त्यांच्याप्रमाणेच लहान मूल होऊन रमलेले अमोल गुप्ते. मुलांना सोबत घेऊन त्यांनी काढलेली चित्रे आणि दिलखुलास गप्पा, त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्याची आणि स्वाक्षरी घेण्याची घाई अशा वातावरणात पारितोषिक वितरणानंतरही गुप्ते यांनी मुलांसोबत सुमारे एक तास घालविला.
Go to Source : marathbar.blogspot.com

No related posts.